आरमोरी : नियती कधी, कुणासाेबत व कधी क्रूर थट्टा करील, याची चाहूलही लागत नाही; पण ह्या क्रूर थट्टेलाही काही सीमा असावी. जर सीमाच राहिली नाही तर दु:ख सहन करणाऱ्याच्याच पदरात जगातील सर्व दु:खे पडतील, अशीच क्रूर थट्टा नियतीने तीन निरागस बहिणींसाेबत केली. आई वाघाच्या हल्ल्याला बळी पडली, तर दिव्यांग वडील पत्नीचा विरह व आजारपणामुळे कायमची साथ साेडून गेले. २० दिवसांत झालेल्या दाेन दु:खद आघातांनी तिन्ही मुली पाेरक्या झाल्या. शिक्षण घेण्याच्या वयात आता त्यांच्यावर एकमेकींचा सांभाळ करण्याची वेळ आली.
समाजमन हेलावणारी ही करुण कहानी आहे, आरमाेरी तालुक्याच्या अरसाेडा गावच्या जांगळे कुटुंबाची. आजारी पती आणि शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचा आईवडील बनून सांभाळ करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या नलूबाई बाबूलाल जांगळे यांचा १३ मे राेजी वाघाने बळी घेतला. नलू व बाबूलाल हे आपल्या तीन मुली सोनाली (ज्ञानेश्वरी), मोनाली व देवकन्या यांच्यासाेबत आनंदात राहत होते. पती १०-१२ वर्षांपासून दिव्यांग व आजारी असल्याने खाटेवरच पडून राहायची. कुटुंबाच्या पालनपाेषणासह मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्या नलूबाईवर होती. मजुरी व स्वमालकीची थोडी शेती करून कुटुंबाचे पालनपोषण सुरू हाेते; मात्र नियतीची वक्रदृष्टी पडली. नलूबाईनंतर दिव्यांग वडिलांचा त्या मुलींना शब्दाचा आधार आणि पाठबळाची हिंमत होती. मात्र आता तोही आधार नियतीने हिरावला अन् तिन्ही मुली आता कायमच्याच पोरक्या झाल्या.
२० दिवसांत पाहिल्या दाेन तिरड्या
गवताच्या झोपडीत परिस्थितीशी झगडून आनंदी जीवन जगणारे कुटुंब काही दिवसांतच अस्ताव्यस्त झाले. अचानक भयाण वादळ यावे आणि क्षणातच सर्व काही संपून जावे, असेच गंभीर संकट जांगळे परिवारावर ओढवले. आईवडील काळाच्या पडद्याआड गेल्याने २० दिवसांत घरून दोन तिरड्या निघाल्या आणि पुन्हा घरावर आभाळ कोसळले.
वनविभागाने मुलीला राेजगार द्यावा
नलूबाई यांची मुलगी साेनाली (ज्ञानेश्वरी) ही नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा ६६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ती राेजगारासाठी पात्र असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साेनालीसाठी बारमाही रोजगार उपलब्ध करावा. तेव्हाच ती दाेन्ही बहिणीचा सांभाळ करू शकेल. अन्यथा त्या निराधार मुली जगणार कशा, असा सवालही गाववासीय करीत आहेत.