"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:14 PM2024-11-24T17:14:30+5:302024-11-24T17:36:48+5:30
महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
Maharashtra Assembly Elections Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून महाविकास आघाडीतील घटकपक्ष मोठा फटका बसला आहे. महाआघाडीच्या तिन्ही पक्षांना दुहेरी आकडा गाठता आला असला तरी ५० आमदारांच्या संख्येपर्यंतही पोहोचता आलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणज हरियाणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त नुकसान हे काँग्रसचे झालं आहे. अशातच महाविकास आघाडीतील पक्षांनी आम्हाला मदत केली नसल्याचे काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसने १०१ जागा लढवल्या पण फक्त १६ जागा जिंकल्या. काँग्रेस पक्षाची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. महाराष्ट्रातील पराभवानंतर काँग्रेस नेत्याने आता महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.
काँग्रेसच्या पराभवाच्या बोलताना परमेश्वरा यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नियोजित पद्धतीने निवडणूक प्रचारात सक्रिय नव्हती, असं म्हटलं आहे. जी परमेश्वरा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक होते.
"लाडकी बहीण योजना खूप प्रभावी ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी योजनेची जाहिरात केली कारण हे सर्व त्यांच्या हातात होते. अखेर आम्ही उमेदवार जाहीर केले आणि पक्षात गोंधळ निर्माण झाला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आपापसात चांगला समन्वय साधता आला नाही. त्यांनी नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही. विशेषतः विदर्भात आम्हाला कमी जागा मिळाल्या. तिथे आम्हाल ५० पेक्षा जास्त जागांची अपेक्षा होती पण फक्त आठच मिळवता आल्या. आम्हाला जे अपेक्षित होतं ते साध्य झालं नाही," असं जी परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.
"अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी काम केले नाही आणि त्यांनी आमच्यासाठी काम केले नाही. आम्ही आघाडीत असताना शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा आणि शिवसेनेने आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा होता. शरद पवारांच्या पक्षाबाबतही तीच समस्या होती," असेही जी परमेश्वरा म्हणाले.