विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:13 AM2024-11-28T08:13:38+5:302024-11-28T08:14:20+5:30

उद्धवसेनेच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चाचपणी, उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’वर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांचे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हणणे होते. 

After the defeat in the assembly elections, Thackeray group, Congress prepare to contest elections on their own | विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई - विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे ही आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.

निकालाच्या आधी दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या, मात्र निकाल लागून पाच दिवस झाले तरी या तीन पक्षांची बैठक झालेली नाही. त्यातच उद्धवसेनेच्या बैठकीत काही जणांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर जाण्याची भूमिका मांडली. उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’वर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांचे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हणणे होते. 

याबाबत उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, लोकसभेत आम्ही सर्व एकत्र लढलो. आम्ही सर्वांनी जागा जिंकल्या. पण आता विधानसभेत गणिते बदलल्याने कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत. पराभव होणे ही काय नवीन गोष्ट नाही, पण अशा पद्धतीने पराभव होईल, असे कोणीही गृहीत धरले नव्हते. त्यामुळे तीव्र भावना व्यक्त होत असतात. सर्वांची मतांतरे, सर्वांचे म्हणणे ऐकून घेणे हे पक्षनेतृत्वाचे, संघटनेचे काम असते. त्यानंतर एकत्रित विचारविनिमय होईल, मग कशा पद्धतीने जायचे ते ठरविले जाईल.

नारा नाही, परंतु काही जणांची तशी भूमिका : दानवे 

अंबादास दानवे म्हणाले की, स्वबळाचा नारा कोणी दिलेला नाही, पण पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात आपली ताकद निर्माण करावी आणि येणाऱ्या काळात ताकदीने तेथे निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका काहींनी व्यक्त केली हे सत्य आहे. पक्ष मजबूत झाला पाहिजे याविषयी आमचे एकमत आहेच. सध्या आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत. परंतु, आघाडी असतानाही उद्धवसेना मजबूत व्हावी यावर कोणी प्रतिकूल असेल असे वाटत नाही. 

पक्षश्रेष्ठींशी बोलून भूमिका : वडेट्टीवार

उद्धवसेनेच्या नेत्यांच्या भूमिकेबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, स्वबळावर लढायची जशी त्यांची इच्छा होती, तशी आमच्यापैकीही काहींची तशी इच्छा होती. पण ते पक्षाचे मत असू शकत नाही. आम्ही आलेल्या निकालाचे विश्लेषण, मंथन करू. याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून आम्ही आमची पुढील भूमिका घेऊ.

Web Title: After the defeat in the assembly elections, Thackeray group, Congress prepare to contest elections on their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.