राज्यसभेतील पराभवानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय, काँग्रेसचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:49 PM2022-06-12T15:49:01+5:302022-06-12T15:49:33+5:30
Vidhan Parishad Election: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीने मोठमोठे दावे केल्यानंतरही शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडीकडून १७२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दावे केले जात असतानाही संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवल्याने शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने आता विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत आपापलं बघून घ्या, सूचक संदेश शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला म्हणावी तशी साथ दिली नाही. राष्ट्रवादीचे समर्थक असलेल्या अपक्षांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले, असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळेच आता विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापलं बघावं, असा सूचक संदेश शिवसेनेनं महाविकास आघाडीमधील या घटक पक्षांना दिला आहे.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये विधानसभेतील आमदारांकडून मतदान होणार आहे. सध्या विधान परिषदेत असलेल्या संख्याबळानुसार भाजपाचे ४ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ आमदार निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. तर काँग्रेसकडून दुसरा उमेदवारही रिंगणात उतरवला जाणार आहे.
या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २७ एवढा मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ४४ आमदारांचं बळ असलेल्या काँग्रेसचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो. तर त्यानंतर काँग्रेसकडे १७ मते उरणार आहेत. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला १० अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत अपक्ष आणि छोट्या पक्षांवर काँग्रेसची मदार असेल. मात्र शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.