महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजपा १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही दमदार कामगिरी करत ५७ जागा जिंकल्या. शिंदे गटाचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. मात्र शिंदे गटामधील प्रमुख आमदार असलेले आणि ‘’काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’’या विधानामुळे फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. शहाजीबापूंना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले. या पराभवानंतर शहाजीबापू पाटील यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता मात्र शहाजीबापू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापच्या उमेदवाराकडून झालेल्या पराभवाचं कारण सांगताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, माझी निवडणूक ही शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या तीन नेत्यांनी हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीत मला मुंबई दिसू द्यायची नाही, असा पण केला. त्यामुळे माझे जीवलग मित्र दीपकआबा साळुंखे हे त्या डावाला बळी पडले. तसेच आम्हा दोघांमध्ये झालेल्या मतांच्या विभागणीमुळे माझा पराभव झाला, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील, ठाकरे गटाचे दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत शेतकरी कामगार पक्षाच्या बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांना २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले होते. बाबासाहेब देशमुख यांना १ लाख १६ हजार २५६ मतं मिळाली. तर शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८७० मतं मिळाली. तर ठाकरे गटाच्या दीपक साळुंखे यांना ५० हजार ९६२ मतं मिळाली होती.