मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शुक्रवारी धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. मात्र शिंदे गटाला चार महिन्यांपूर्वी देण्यात आलेल्या ढाल-तलवारी यांचे आता काय करायचे, असा प्रश्न शिंदे समर्थकांना पडला आहे. आता धनुष्यबाणांसाठी शोधाशोध सुरू झाली आहे. शिंदेंना ढाल-तलवार निशाणी मिळाल्यावर त्या बाजारात सहज मिळत नव्हत्या. आता धनुष्यबाण मिळणे मुश्कील होईल. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मंडळींना ढाल-तलवारी देऊन त्यांच्याकडून धनुष्यबाण उधार घ्यायचा का? अशी कुजबुज सुरू आहे.
एकीकडे १६ आमदारांच्या अपात्रेसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना वापरता येणार नाही. ठाकरे गटासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. यातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, एका याचिकेद्वारे न्यायालयाला महत्त्वाची विनंती केली आहे.
शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर, शिंदे गट आणि भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तुम्ही ज्यापद्धतीने धनुष्यबाण चोरला आहे ना, त्या चोरांना माझे आव्हान आहे. तुम्ही धनुष्याबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. होऊ द्या निवडणूक, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.