नागपूर - सत्तेतील आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विविध चर्चेला उधाण आले आहे. त्यात राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या काही घडामोडी घडतायेत का अशीही चर्चा आहे. मात्र या भेटीवरून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, इंडिया आघाडीत आले तर बच्चू कडूंचे स्वागत आहे. हायकमांडकडे चर्चा करून आणि चर्चेतून निर्णय घेऊ. सत्तेतून बच्चू कडू यांचा भ्रमनिराश झाला असावा. बच्चू कडूंचा कल असेल तर चर्चा होईल. राजकारणात जी भूमिका जो मांडतो त्यावर चर्चा होते. १० तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव बोहल्यावर बसेल. मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा जोरात आहे. त्या चर्चेचा भाग म्हणून मी बोलतोय. त्यामुळे १० तारखेसाठी अनेकांनी बाशिंगे बांधून, ड्रेस तयार ठेवलाय. त्याची तयारी आता सुरू झाली. बच्चू कडू यांची भेट कदाचित त्यातूनच झाली असावी असं वाटतं असं त्यांनी म्हटलं.
तर अमरावतीतील वर्धा, अमरावती या लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली. ही चर्चा राजकीय नव्हती. भेट होती. एकनाथ शिंदे असेपर्यंत मी साथ सोडणार नाही. काही संकेत वैगेरे नाही. राजकीय चर्चा झाली नाही. शेतीवर चर्चा झाली. भेटीचं आमंत्रण स्वीकारले ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसत्या. तेवढे तारतम्य ठेवले पाहिजे. आकाशात अजून ढग आले नाही. ढग आल्यावर पाहू. सध्या खरे बोलले म्हणजे सत्तेविरोधात बोलले असं होते. जे खरे आहे ते सरकारविरोधातच असेल असा वेगळा अर्थ काढणे गरजेचे नाही. शेतकरी आमचा मायबाप आहे. नेत्यांची गुलामी होण्याची मानसिकता आमच्या डोक्यात येणार नाही. राजकीय प्रस्तावावर चर्चा झाली नाही. चर्चा झाली तर आमच्या पक्षाचे भले करू. आम्हाला २-३ दरवाजे उघडे आहेत. आम्ही जाणीव ठेवणारे लोक आहोत अशा शब्दात बच्चू कडू यांनी पवार भेटीवर भाष्य केले आहे.