लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच; चार जागांसाठी इच्छुकांची फिल्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:50 PM2024-05-27T13:50:35+5:302024-05-27T13:51:25+5:30
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीतही महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. उद्धव सेनेकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच मुंबई शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचे सांगत डॉ. दीपक सावंत यांनी दावा केला आहे. भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे.
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. मुंबई पदवीधरसाठी ॲड. अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी ज. मो. अभ्यंकर यांचे नाव उद्धव सेनेने जाहीर केले आहे. शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत. तर मुंबई पदवीधरवर दावा सांगताना परंपरा विचारात घेतली तर ही जागा शिवसेनेनेच महायुतीत लढवावी, असा पवित्रा डॉ.दीपक सावंत यांनी घेतला आहे.
कोकण पदवीधरचाही घोळ
- कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार होते. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा ही जागा भाजपकडूनच लढवली जाणार असून उमेदवार म्हणून पुन्हा एकदा डावखरे यांच्याच नावाची चर्चा आहे.
- महाविकास आघाडीत मात्र उद्धव सेना आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत. उद्धव सेनेकडून सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
- काँग्रेससुद्धा आग्रही असून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. रायगडमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी तिरंगी लढत
- उद्धव सेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांच्याविरोधात शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- याआधी कपिल पाटील यांनी शिक्षक भारतीकडून ही जागा लढवली होती.
- महायुतीही ही जागा लढविण्याच्या तयारीत असून महायुतीची सुकाणू समिती उमेदवारीचा निर्णय घेणार आहे.
- त्यामुळे या जागेवर तिरंगी लढत हाेणार आहे. आघाडीत काँग्रेस न ऐकल्यास याठिकाणी चौरंगी लढतीचीही शक्यता आहे.
नाशिकमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
नाशिकमध्ये उद्धव सेनेचे किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. इथल्या प्रबळ दावेदार शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडल्याने एका गटाने नगरचे निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब कचरे, तर दुसऱ्या गटाने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
संजीवनी विद्यापीठाचे विश्वस्त विवेक कोल्हे यांनीही अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, धनराज विसपुते, निशांत रंधे हेही निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, हेही उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. राजेंद्र निकम हेही जुनी पेन्शन माध्यमिक शिक्षक संघटनेकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आघाडी-युतीच्या गणितापेक्षा वेगळेच समीकरण पाहायला मिळू शकते.