भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार," असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्याने याची अधिक चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही रजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
एवढेच नाही, तर मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट करत, आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन संबंधित बड्या नेत्याचा खुलासा करणार आहोत, असेही म्हटले आहे. याशिवाय, आपण संबंधित नेत्याची देशातील आणि परदेशातील मालमत्ता, बेनामी कंपन्या, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता, मंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणी मालमत्ता, यांसंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता ती खास मैत्रीण कोण? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, मोहित कंबोज यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये, सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला आहे. 2019 मध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हायला हवी, असे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.