सांगली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत काहींनी ‘किंगमेकर’ म्हणून दुसऱ्या फळीतील नेत्यांचे फलक झळकवले. काहींनी समाज माध्यमावर स्वत:ला मिरवले. आता प्रत्येक भागातील मतेही सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागली आहेत. प्रामाणिकपणे कोणी काम केले? ते निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी मतदारांनी विजयी उमेदवारांना तारल्यानंतर तटस्थ राहिलेलेदेखील ‘किंगमेकर’ म्हणून स्वत:ला मिरवू लागलेत.निवडणूक लढण्यासाठी खंदे समर्थक, कार्यकर्ते आदींची रसद आवश्यक ठरते. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून उमेदवार, त्याचे कार्य, चिन्ह आदी माहिती पोहोचवावी लागते. प्रत्येक भागात मते खेचून आणण्यासाठी समर्थक, कार्यकर्ते सज्ज ठेवावे लागतात. बुथवर सक्षम यंत्रणा आवश्यक ठरते. यामध्ये जो अधिक यशस्वी होतो तो विजयी होतो. मतमोजणीनंतर कोणत्या भागात कोणी काम केले? कोणी उदासिनता दाखवली? कोणी विरोधकांचे काम केले? कोणी रात्रीत मते फिरवली? आदी माहिती आकडेवारीवरून स्पष्टच होते. त्यावरून कोण खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरला हे सिद्ध होते.
निकालानंतर जिल्ह्यात निघालेल्या मिरवणुकांमध्ये विजयी उमेदवारांबरोबर ‘किंगमेकर’ म्हणून अनेकांनी कार्यकर्त्यांमार्फत स्वत:च्या छबी झळकवल्या. काहींनी त्यासाठी स्वत: ‘फिल्डिंग’ लावली होती. निकालानंतर कोणत्या भागात कोणी प्रामाणिक काम केले? हे आता आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे जे ‘किंगमेकर’ म्हणून चर्चेत आले आहेत, त्यांनी खरोखर किती काम केले? हे समोर आले आहे.‘किंगमेकर’ म्हणून चर्चेत आलेले खंदे समर्थक आता पुढील निवडणुकांची तयारी करण्यात गुंतले आहेत. विजयी उमेदवारांना त्यांना ताकद द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सर्वच मतदारसंघांत प्रचारात फारसा रस न दाखवणारेही ‘किंगमेकर’ म्हणून पुढे येऊ लागले आहेत. उमेदवार विजयी झाल्यानंतर यांनी गुलाल उधळून सर्वांत राहून जल्लोष केला. परंतु, प्रामाणिकपणे कोण काम करत आहे? यावर अनेकांनी करडी नजर ठेवली होती. त्यामुळे खरा ‘किंगमेकर’ कोण? हे उमेदवार नक्कीच जाणून आहेत.
जनता आणि कार्यकर्तेच ‘किंगमेकर’काही मतदारसंघात काम न करता स्वत:ला ‘किंगमेकर’ म्हणवून घेण्यासाठी काही मंडळी धडपडत आहेत. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. काही सुज्ञ कार्यकर्त्यांनी जनता आणि कार्यकर्तेच खरे ‘किंगमेकर’ असल्याचे समाज माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.