राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि पक्षात बंडखोरी करून भाजपाशी हातमिळवणी करणारे अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. या भेटीबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र तरीही राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच शरद पवार यांच्या मनातन नेमकं चाललंय काय, याबाबतही अंदाज घेतला जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे, काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले की, अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. त्यांचे नातेवाईक आहेत तर घरी भेट घेता येते, पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे कशासाठी? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत यावर चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेवर निशाणा साधला आहे. उद्या आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासोबत चहा-पानाला बसू लागलो तर काय होईल. आम्ही नेत्यांनी त्यांच्यासोबत बसायचं आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं, असलं ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.