मुंबई - सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडून जात असताना आपली निष्ठा कायम राखत निवडणुकीला सामोरे जाणारे शशिकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. मात्र पवारांनी त्यांच्या निष्ठेची कदर करत त्यांना पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती दिली. तसेच त्यांच्यावर एक मोठी कामगिरी सोपविली आहे.
राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्या पाडाव केल्यानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर गणेश नाईक असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील गणेश नाईकांचा गड पाडण्याची जबाबदारी पवारांनी शिंदे यांच्यावर सोपविली आहे. गणेश नाईक विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांचे वजन आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यक्षेत्र नवी मुंबईतही आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, या विचाराने शिंदे यांना नाईकांशी दोन हात करण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे.
गणेश नाईक आपल्या पुत्रासह भाजपमध्ये सामील झालेले आहेत. जाताना ते राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांसह भाजपमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादीसाठी ऐन निवडणुकीच्या काळात मोठा धक्का मानला जात होता. आता मात्र राज्यातील बदलेली स्थिती पाहता, पवारांनी शिंदे यांना गणेश नाईकांच्या गडाचा पाडाव करण्यासाठी पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.