मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमाने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनापासून बचावासाठी पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले. तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
"नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे निराश करणारे फेसबुक लाईव्ह. जनतेच्या नाराजीची दखल न घेता जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे, वीजबिलाबाबत काहीही दिलासा नाही, शेतकऱ्यांना काही मदत नाही, राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत, ना ठोस कृती ना उपाय," असे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. "ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते. मुख्यमंत्री प्रत्येक लाईव्हमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काळजी घ्यायला सांगतायत. मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे, ते घरी बसलेत, निर्णय घेत नाहीत, अर्थपूर्ण बदल्या, बढत्या सोडून प्रशासन ठप्प झाले आहे, त्यामुळे जनतेला काळजी घेणे भाग आहे," असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
काय म्हणाले होते ठाकरे - राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठकरे म्हणाले, गर्दी वाढली म्हणजे कोरोनाचे संकट संपले असे समजू नका. कोरोनापासून एक-दोन नव्हे तर चार हात दूर रहा. धोक्याच्या वळणावर सावध राहा. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, हे उघडा, ते उघडा, म्हणत आहेत. हो सर्व उघडतो! जबाबदारी घेताय?, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना केला. तसेच, या सरकारच्या माध्यमाने जनतेची जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असेही ते म्हणाले.
जनतेला आवाहन करत ठाकरे म्हणाले, कोरोनापासून स्वतःचा बचाव करा, कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका. पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही. रुग्ण संख्येत वाढ झाली आणि रुग्णालये कमी पडली तर कुणीही वाचवू शकणार नाही. कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यासंदर्भात प्रश्नचिन्हच आहे. त्या उघडायच्या आहेत पण भीती आहे.
कोरोनासंदर्भात केल्या जाणाऱ्या सूचनांसंदर्भात जनतेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. "गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. आपले सर्वच सण गर्दीचे होते. मग त्यात गणपती असेल, दिवाळी आणि दसरा असेल. हे सर्व सण आपण अतिशय साधेपणाने साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण ऐकता, तुमच्या या सहकार्याला तोड नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचे सहकार्य मिळत राहो," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या शिवाय, मास्क न लावणाऱ्यांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच नियमांचे काटेकोर पणे पालन करा अशी विनंतीही त्यांनी यावेळी जनतेला केली. याशिवाय ज्याप्रमाणे साधेपणाने आपण सण उत्सव साजरे केले अगदी त्याच प्रमाणे कार्तिकी यात्रेलाही कृपया गर्दी करू नका, उसे उद्धव ठाकरे म्हणाले.