उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:41 AM2019-12-19T11:41:29+5:302019-12-19T16:52:29+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले.
मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे खिचडी सरकार असून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हे टिकणार नाही, अशी टीका विरोधक पहिल्या दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र विद्यमान सरकारमध्ये सुसूत्रता येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून या अभद्र युतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
दरम्यान महाविकास आघाडीच्या स्थापनेला महिना झाला असून अद्याप सर्वकाही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामावून घेत असून भाजपच आपला शत्रू असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती.
उद्धव यांच्या या टीकेवर पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही. अर्थात शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.