औरंगाबाद - MIM मुळे आमचा पराभव होतो आणि भाजपाला फायदा होतो असं जर काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. आपण एकत्र बसूया. निवडणूक एकत्रित लढवूया. भाजपाला कसं हरवता येईल यावर चर्चा करू अशी खुली ऑफर MIM खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिली आहे. त्यामुळे राज्यात वंचित-ठाकरे गट युतीनंतर आता MIM काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं पुढे आले आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सोबत लढण्याबाबत आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला ऑफर दिली होती. मुस्लीम समाज आमची प्रॉपर्टी हे राजकीय पक्षांना वाटत होते. अशावेळी MIM आली तेव्हा लोक हुशार झालेत. जर आमच्यामुळे भाजपाचा फायदा होतो असं वाटत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आम्ही लढायला तयार आहेत. तुम्ही आम्ही एकत्र मिळून निवडणूक लढूया. मुस्लिम समाजाला बाजूला करून स्वत:ची चूक सुधारण्याऐवजी पराभव झाल्यावर MIM मुळे झाला असं म्हणतात. आम्ही ज्याठिकाणी निवडणूक लढवत नाही तिथे काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा असं कुणी बोलत नाही. आपमुळे आम्हाला नुकसान झाले वैगेरे. आमचा राजकीय पक्ष आहे. आम्ही निवडणूक लढणार नाही तर गोट्या खेळणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
तसेच जेव्हा पराभव होतो तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटतं MIM इतका मोठा पक्ष झालाय त्यामुळे पराभवाचं कारण MIM आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं पुढाकार घ्यावा, MIM सोबत यायला तयार आहे. एकत्र बसून भाजपाचा पराभव कसा होईल हे पाहू. आम्हाला युतीचे काही प्रस्ताव आलेत. आम्ही त्यावर चर्चा करत आहोत. २०१९ ला केवळ एकाच जागेवर आम्ही निवडणूक लढलो होतो. २०२४ वेळी आम्ही आणखी काही जागा लढवू. एमआयएमचा खासदार निवडून आल्यानंतर जाणुनबुजून जे दहशतीचं वातवरण पसरवण्यात आले ते आता लोकांमधील गैरसमज दूर झाला आहे. दिल्ली, मुंबईत काही बैठका होतील. कुणासोबत निवडणूक लढवायची याबाबत अध्यक्षांसोबत चर्चा करू अशी माहितीही जलील यांनी दिली आहे.
सर्व्हेवर विश्वास नाही, पुन्हा निवडून मीच येणारसर्व्हेवर माझा जास्त विश्वास नाही. मागच्यावेळी लोकसभा निवडणुकीत अनेक सर्व्हे झाले ते फेल गेले. औरंगाबाद जागेवर MIM चा विजय पक्का आहे. त्यामुळे ही जागा सोडून इतर ४७ जागांचा सर्व्हे करावा. ज्या लोकांनी माझे काम पाहिलंय तेच लोक माझा विजय पुन्हा करतील. मला औवेसी यांनी प्रश्न विचारला, तुम्ही निवडून कसं येणार हे गणित सांगा, त्यावेळी मी कसा निवडून येणार हे नका विचारू मी जिंकणार असं म्हटलं. त्यामुळे यंदाही कुणालाही मैदानात येऊ द्या. मी निवडून येणार आहे. निवडणुकीत चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. करा नाहीतर मरा अशी परिस्थिती नाही. जोपर्यंत मी लोकांच्या हृदयात तोपर्यंत काम करत राहणार. निवडणुकीत लोक सर्वोच्च असतात. ते ऐनवेळी कुणाला मतदान करतील सांगता येत नाही. माझा पराभव करण्यासाठी काही विशेष लोकांकडून प्रयत्न सुरू आहेत. जनता सोबत असेल तर कितीही प्रयत्न केले तर काही चालणार नाही असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
मी MIM मध्येच राहणार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो. जे बोलण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला औवेसींनी दिले आहे. ते इतर कुठल्याही पक्षात मला मिळणार नाही. मुस्लीम समाजाला केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला. केवळ विरोधात असताना मुस्लीम आठवतात. सत्तेत असताना मुस्लीम समाज का आठवत नाही. लोकांमध्ये फिरणारा, मुस्लीम समाजाची काय समस्या आहे हे जाणून घ्यायला हवं असं जलील यांनी स्पष्ट केले.
विरोधात बसल्यावर मुस्लिमांची आठवणवक्फ बोर्डाची अडचणी, मुस्लीमांना आरक्षण हे किती विषय आहेत. मुस्लिमांसाठी छोटे छोटे प्लॉट का देत नाहीत. रोजगार वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. मुस्लिमांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत विकास शक्य नाही. दुटप्पी भूमिका घेण्याचं काम राजकीय पक्ष करतात. मुस्लिमांची मते घेऊन सत्तेत जायचं आणि मुस्लिमांना सत्तेत असताना काहीच द्यायचं नाही. विरोधात बसल्यावर मुस्लिमांसाठी कळवळा येतो. राजकीय भूमिका काय घ्यायच्या हा प्रत्येक पक्षाचा स्टँड असतो. त्यात बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप नको. प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्यांना शुभेच्छा आहेत. या राज्यात ज्या युती, आघाडी बघत आहोत त्याचा विचारही लोकांनी केला नव्हता. त्यामुळे काही सरप्राईज पॅकेजही आमच्याकडे असेल असा दावा जलील यांनी केला आहे.