नरेश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - होय, कारागृहातील महिला सुरक्षित नाहीत. भेसूर भिंतीआड त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यांना नेहमीच मारहाण होत असते. भायखळा कारागृहातील अधिकारी, कर्मचाºयांच्या अमानुषतेला बळी पडलेल्या मंजुळा शेट्येच्या प्रकरणातून हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे राज्य महिला आयोग अधिक सतर्क झाले असून, आता राज्यातील सर्वच कारागृहातील महिला कैद्यांच्या सुरक्षेकडे आयोग सूक्ष्म नजर ठेवणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पोलीस सखी (बडी कॉप्स) कार्यक्रमाच्या निमित्ताने रहाटकर मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. प्रस्तुत प्रतिनिधीने बहुचर्चित मंजुळा शेट्ये प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्याशी बातचित केली असता त्या म्हणाल्या, हे प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. कारागृहाच्या आतमध्ये महिलांवर अत्याचार होऊ शकत नाही, असा एक समज असतो तो गैरसमज ठरला.
केवळ दोन अंडी आणि तीन पावांचा हिशेब देऊ न शकल्यामुळे भायखळा कारागृहातील अधिकारी कर्मचाºयांनी मंजुळा शेट्येला अमानुष मारहाण केली. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी कर्मचाºयांवर गुन्हा दाखल झाला आहे. महिला-मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चा आणि चिंतेचा विषय असतो. या प्रकरणाने कारागृहातील महिला कैद्यांच्याही सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. महिला आयोगाची त्यासंबंधाने काय भूमिका आहे, हे जाणून घेण्याचा लोकमतने प्रयत्न केला. त्याअनुषंगाने रहाटकर म्हणाल्या, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आक्रमक पवित्रा घेत सुमोटो दाखल केला. या प्रकरणाची निष्पक्ष अन् कसून चौकशी व्हावी म्हणून महिला आयोगाने विशेष तपास पथकाचीही निर्मिती केली. त्यात निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश आहे. प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी आणि कारागृहातील महिला कैद्यांची काय अवस्था आहे, त्याची माहिती घेण्यासाठी आपण भायखळाच नव्हे तर मुंबई, ठाणे, नाशिकसह ठिकठिकाणच्या कारागृहात भेटी दिल्या. सुमारे ३०० महिला कैद्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्यातून महिला कैद्यांना आतमध्ये नेहमीच अमानुष मारहाण होत असल्याचे पुढे आले आहे. याशिवायही महिला कैद्यांच्या अनेक समस्या उघड झाल्या आहेत. त्यामुळे महिला कैद्यांच्या सुरक्षेवर महिला आयोग आता विशेष नजर ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
इंद्रायणीनेही केली तक्रार-
देशभर खळबळ उडवून देणाºया शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्रायणी मुखर्जी ही कारागृहात भेटली. तिनेही महिला कैद्यांवर कारागृहात अत्याचार केले जात असल्याची तक्रार केली. तिच्या तक्रारीतील तथ्यही आम्ही तपासत असल्याचे रहाटकर म्हणाल्या. यापुढे आपण राज्यातील विविध कारागृहात आकस्मिक भेटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले.
विदर्भातील कारागृहांना सूचना-
या प्रकरणामुळे राज्यातील कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागाच्या कारागृहाचे विशेष उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी विदर्भातील सर्व कारागृहाच्या अधिका-यांना खास निर्देश दिले आहेत. महिला कैद्यांच्या अडचणी समजून घ्या, त्यांच्या सुरक्षेसंबंधाने योग्य उपाययोजना करा, त्यांची काळजी घ्या, असे सूचनापत्रही त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, नागपूर विदर्भातील विविध कारागृहात महिला कैद्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात नागपूर आणि अमरावती कारागृहात २०० पेक्षा जास्त महिला कैदी आहेत.