बदलापूर - शहरातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी २० ऑगस्टला बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. बदलापूर प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकरणी १२ तास गुन्हा दाखल करण्यास विलंब लावल्याने लोकांमध्ये राग आहे. या प्रकरणाला नेमकी वाचा कशी फुटली याबाबत घटनाक्रम समोर आला आहे.
मनसेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले. मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं. या मनसे महिला पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनीही संवाद साधला. यावेळी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. अविनाश जाधव म्हणाले की, कालपासून राजसाहेबांचा मला सातवा-आठवा कॉल आहे. सतत त्या मुलींची परिस्थिती, तिच्या कुटुंबाची विचारणा केली. १३ तारखेला ही घटना घडली. १५ तारखेला पीडित मुलीच्या कुटुंबाने राज ठाकरेंच्या नावाने मनसेला पत्र लिहिलं. १५ तारखेला ते कुटुंब मनसे कार्यालयात आले. आमच्या संगीता चेंदवणकर यांना भेटले. १६ तारखेला दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलीस स्टेशनला थांबले. तिथे भांडले. त्यानंतर रात्री १ वाजता आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली असं त्यांनी म्हटलं.
तसेच मनसे तेवढ्यावरच थांबली नाही तर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक व्हावी यासाठी प्रयत्न केले. बंदलापूर बंदची हाक ही संगीता चेंदवणकर आणि इतर पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर पुढे जे काही झाले हे बदलापूरकरांनी पाहिले.
१५ दिवसापूर्वी अशीच एक घटना बदलापूरात घडली होती. तेव्हाही संगीता चेंदवणकर यांनी आवाज उठवला होता. तेव्हा त्याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थोडं सांभाळून घ्या, मी यात लक्ष घालते असं सांगत थातूरमातूर उत्तरे दिली. मग त्यातला मुख्य आरोपी पळून गेला. त्यामुळे या प्रकरणी मनसेनं कुठलीही दिरंगाई केली नाही. प्रकरण लावून धरले त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आले. त्यामागे संगीता चेंदवणकर आणि मनसेची बदलापूरची टीम आहे. बदलापूर बंदमध्ये लोक आंदोलनात उतरले. लोकभावनेतून ज्या गोष्टी घडायच्या त्या घडल्या. मनसे त्या आई वडिलांच्या पाठिशी खंबीर उभी राहिली. येत्या २६ ऑगस्टला राज ठाकरे बदलापूरात येतील आणि बदलापूरकरांना भेटतील असं अविनाश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मी शेवटपर्यंत राजकारण केले नाही. मनसेची पदाधिकारी आहे म्हणून मी तो विषय घेतला नव्हता. जर सर्व पक्षाचे नेते बदलापूरात काम करतात. मोठमोठे नेते बदलापूरात आहेत. आमदार-खासदारांची माणसे असतानाही आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांकडे, मनसेकडे पालकांना यावं लागतं यातच आमचा विजय आहे. कारण मनसेच हे काम करू शकते असं त्या पालकांना वाटलं. विषय जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी गांभीर्याने घेतले. त्यावेळी माझ्या इतर पक्षातीलही मैत्रिणी आहेत त्यांनाही मी सांगितलं आणि तिथून ठिणगी पेटली. बदलापूरात याआधीही असे प्रकरण घडले त्यातूनच हा उद्रेक पाहायला मिळाला असं मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी सांगितले.