मुंबई - मुंबईच्या किना-यावर घोंगावणा-या ओखी वादळाच्या इशा-यानंतर मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरूच राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.याआधी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सायंकाळी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. हवामान खात्याने ओखी वादळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिना-यांवर धोक्याचा इशारा दिला आहे. परिणामी, खबरदारीचा उपाय म्हणून फक्त मंगळवारी समुद्रकिना-यालगतच्या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच तावडे यांनी निर्णय बदलला. केवळ शाळांना सुटी देत असल्याचे ट्विट त्यांनी केले. यासंदर्भात विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालय सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली. चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारच्यासुट्टीमुळे होणारे शैक्षणिक नुकसान इतर सुटीच्या दिवशी भरून काढण्याचे आदेश शाळा व महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. संबंधित शाळा व महाविद्यालय त्यांच्या सोयीने हे शैक्षणिक नुकसान भरून काढतील. तरी बुधवारी नियमित वेळेनुसार सर्व शाळा व महाविद्यालय सुरू राहतील..................................अफवांमुळे विद्यार्थी व पालक संभ्रमातहवामान खात्याने ओखी वादळामुळे मुंबईतील समुद्रकिना-यांना धोक्याचा इशारा दिला होता. सोबतच पश्चिम भागात पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचा अंदाजही वर्तवला होता. मात्र ओखी वादळामुळे मुंबईभर जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची अफवा दुपारपासूनच सोशल मीडियावर पसरली. त्यात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवत कामगारांना सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, या अफवेची भर पडली. अखेर सायंकाळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी समुद्रकिना-यालगतच्या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुटी घोषित केली. मात्र नेमक्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील.- डॉ. अर्जुन घाटुळे,संचालक, परीक्षा व मूल्यमापन
विद्यापीठ आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू असतील.- डॉ. दिनेश कांबळे,कुलसचिव