नारायण जाधव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडून गेलेले ९ नगरसेवक तर पक्ष सोडण्याच्या आवईमुळे नाराज झालेले श्रेष्ठी अशा प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या सत्त्वपरीक्षेत गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. योग्य राजकीय डावपेच, शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी याचा अचूक लाभ घेत त्यांनी १११पैकी ५२ जागा जिंकल्या आणि आपणच नवी मुंबईचे ‘दादा’ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. शिवसेनेला ३८, भाजपाला ६, काँगे्रसला १० आणि अपक्षांना ५ जागा मिळाल्या असल्या तरी त्यात २ राष्ट्रवादी पुरस्कृत आणि २ बंडखोर असल्याने महापालिकेची सत्ता राखण्यासाठी आवश्यक असलेली ५६ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे नाईक यांना अवघड नाही. त्यातही त्यांनी काँग्रेससमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. उपऱ्या नेत्यांकडे पक्षाची सूत्रे सोपविल्याने पोषक वातावरण असतानाही शिवसेनेला सत्तेचा सोपान चढणे कठीण गेले.महापालिकेतील घराणेशाहीमुळे गणेश नाईक यांच्याविरोधात नवी मुंबईत प्रचंड असंतोष होता. त्यातच विधानसभेतील पराभवामुळे नाईकांच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी समर्थकांनी त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरला. त्यावर नाईक यांनी मौन बाळगल्याने श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज तर झालेच; मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर पाटकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, नारायण पाटील, एम. के. मढवी, विनया मढवी, मधुकर मुकादम यांनी शिवसेनेत तर कविता जाधव यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, आयारामांना पक्षात प्रवेश देताना नाहटा यांनी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंसह एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात घेतले नाही. युतीची बोलणी करायला आणि जागावाटपातही एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, विजय नाहटा तर भाजपाकडून आमदार संजय केळकर, मनोज कोटक ही तशी बाहेरचीच मंडळी होती. शिवसेनेच्या नेत्यांनी आयारामांच्या कुटुंबात २ ते ३ तिकिटे दिली. विजय चौगुले, विठ्ठल मोरे यासारख्या नेत्यांच्या घरातही २ ते ५ तिकिटे दिली. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली. ती बंडखोरीच्या रूपाने उफाळून आली. साहजिकच सुमारे ४१ ठिकाणी बंडखोरी झाली. बंडखोरांनी उपऱ्या नेत्यांविरोधात बंड केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी बंडखोरांची हकालपट्टी केली. दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी भाजपाच्या बंडखोरांवर मात्र कोणतीही कारवाई केली नाही. तेथेच शिवसेनेचा घात झाला. त्यांच्या ७ ते ८ जागा गेल्या. उपऱ्या नेत्यांमुळेच युतीचा घात झाला, तर माथाडींनी घणसोली-कोपरखैरण्यात साथ न दिल्याने राष्ट्रवादीच्या ४-५ जागा गेल्या.
उपऱ्यांमुळे झाला शिवसेनेचा विचका
By admin | Published: April 24, 2015 1:41 AM