मुंबई - विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत पडझड सुरू झाली. राष्ट्रावादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. मावळचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आपले मतं मांडले. पक्षातील पडझड म्हणजे संकट नसून ही एक संधी असल्याचे कोल्हे यांनी युवक कार्यकर्त्यांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी आहे, युवक मित्रांनो. या संधीच सोनं करा, असं आवाहन कोल्हे यांनी युवकांना केले.
यावेळी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. स्वराज्यावर अफजलखान चाल करून आला होता. तेव्हा सर्वांनाच त्याची भिती वाटत होती. बलाढ्य सेनेसह आलेल्या अफजल खानाने तमाम सरदारांना, मांडलिकांना आमच्यात सामील व्हा, तरच तुम्ही सुरक्षित राहू शकाल असं फर्मान सुनावले. त्यामुळे अनेक सरदार, मंडलिक अफजल खानाला सामीलही झाले. तशीच काहीशी परिस्थिती आताही आहे. इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. परंतु, महाजारांनी यातून संधी शोधल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांसमोर शरणागती पत्करण्याचा पर्याय होता. परंतु, दख्खनमधून मोठा योद्धा येत आहे, त्याला पराभूत केले तर दख्खनमध्ये सर्वांनाच कळेल, शिवाजी महाराज काय आहेत. ही संधी होती. महाराजांनी आलेल्या संकटात संधी शोधली. आपण महाराजांचे मावळे असून यातून आपल्याला संधी शोधायची, अस डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.