पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:55 PM2019-08-01T17:55:14+5:302019-08-01T17:55:54+5:30
२०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.
मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळावलेल्या विजयानंतर सर्वात मजबूत ठरलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्याचा विश्वास आहे. परंतु, सध्या भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना देण्यात येत असलेला प्रवेश पाहून भाजपच स्वरुप राष्ट्रवादी जनता पार्टी असं होतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध घोटाळ्यांच्या आरोपांनी २०१४ ची निवडणूक गाजली होती. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना तुरुंगात जाव लागणार असा इशारा, त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र तस काहीही झालं नाही. याउलट २०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.
आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ३० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये महिला नेत्यांचा देखील समावेश आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचे समजते. भाजपमध्ये ही इनकमिंग अशीच सुरू राहिल्यास, येणाऱ्या काळात भाजप नेतृत्वाला देखील पक्षांतर करून आलेले आणि पक्षातील नेते यांचा हिशोब ठेवण्यासाठी खास माणसं नियुक्त करावी लागतील.
स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी
भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याची कारण आता स्पष्ट होत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजप निवडणुकीला सामोरे गेले. त्याचवेळी विधानसभेला देखील युती राहणार हे निश्चित करण्यात आले होते. परंतु, राज्यात वाढलेली ताकत पाहता भाजपचा इरादा स्वबळावर लढण्याचा दिसून येतो. अशा स्थितीत स्वबळावर लढायचे म्हटल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेणे फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे भाजपची ही स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी असण्याची दाट शक्यता आहे.