- सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघण्याची एवढ्यात शक्यता नसल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे करायचे काय? या प्रश्नाभोवती सध्या चर्चा सुरू आहे. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शनिवारी रात्री चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारला अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होती. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कोणता यावर आता खल सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारला पंजाबच्या दौऱ्यावर होते. ते रात्री तेथून आले. त्यांचे विमान साधारणत: दिल्लीतील पालम विमानतळावर उतरते. याचवेळी औरंगाबाद येथून मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत आले. केंद्रीयमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर रात्री चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
अपात्रतेच्या याचिकांमुळे भाजप नेतृत्वासमोर प्रश्नअपात्रतेच्या याचिकांवर कोणताही निर्णय लागलेला नसल्याने या बंडखोर आमदारांचे करायचे काय? हा मुख्य प्रश्न भाजपच्या नेतृत्वासमोर आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यास असंतोषाचा भडका उडू शकतो. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याची घटनात्मक जबाबदारी शिंदे सरकारला पार पाडावी लागणार आहे. यामुळे मंत्रिमंडळात किमान सदस्य असण्याची आवश्यकता आहे. एक महिना झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आमदारांमध्येही धाकधूक वाढली आहे.