लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी सायंकाळी उलटलेला सिमेंटचा ४० टन वजनाचा टँकर सोमवारी दुपारनंतर बाजूला घेण्यासाठी पुण्याकडे येणारा मार्ग थांबविण्यात आला होता. त्यामुळे खंडाळा परिसरात पुन्हा एकदा वाहतूककोंडी झाली होती.रविवारी सायंकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला सिमेंटचा टँकर खंडाळा एक्झिटजवळच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्तादुभाजकावर उलटला होता. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल अडीच तासांनंतर हा टँकर पुणे लेनवर सरकवत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. टँकरमध्ये ४० टन सिमेंट असल्याने तो तीन क्रेन लावूनही उचलणे शक्य होत नसल्याने रविवारी रात्री अपघातग्रस्त टँकर पुणे मार्गिकेवरील तिसऱ्या लेनवर सरकवत दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारी हा टँकर उचलून मार्गावरून बाजूला करण्यात आला. याकरिता वाहतूक रोखून धरण्यात आल्याने पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)
द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूककोंडी
By admin | Published: June 14, 2016 3:01 AM