रेवदंडा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला रेवदांडा गावातील आगरकोट किल्ला ढासळत आहे. पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी करावी, जेणेकरून हा वारसा जोपासता येईल, अशी मागणी स्थानिकांसोबतच दुर्गप्रेमी करत आहेत.पोर्तुगीज, इंग्रज आणि मराठे या सत्तांच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ल्यांचा विशेष तटबंदीसारखा भाग अखेरीची घटका मोजत आहे. साधारण १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांचे आगमन या भागात झाले. काही वर्षांचा काळ सोडल्यास अनेक दशके त्यांनी या भागावर सत्ता राखली. सन १५२४ मध्ये हा किल्ला बांधल्याच्या नोंदी सापडतात. मराठ्यांनी पण हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना तो जिंकता आला नाही. दरम्यान, एका तहानुसार रेवदंडा मराठ्यांकडे आला. सन १८१८ मध्ये त्याचा ताबा मराठ्यांकडे गेला.सातखणी बुरूज पर्यटकांचे आकर्षणकुंडलिका खाडीच्या बाजूने किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. पुरातत्व खाते किल्ल्यातील काही वास्तूंची दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवत जाते. किल्ल्यातील सातखणी बुरूज पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण असून, ही वास्तू पहायला हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. किल्ल्यांची तटबंदी अनेक ठिकाणी तडे जाऊन भरतीच्या पाण्याने मारा खात असल्याने पडझड झाली आहे. या तटबंदीची दखल पुरातत्व खात्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.
आगरकोट किल्ला होणार नामशेष?; डागडुजी करण्याची रेवदंडाकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 6:30 AM