Supriya Sule Vs Praful Patel ( Marathi News ) : सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा विरोध डावलून अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीच्या सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर स्वत: अजित पवार यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून शरद पवार हे आता वयोवृद्ध झाले असून त्यांनी विश्रांती घेऊन नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं सांगितलं जात होतं. मात्र आज एका महिला खेळाडूचं अभिनंदन करताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वय हा तर फक्त एक आकडा आहे, असं म्हटलं. हीच संधी साधत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "जेव्हा एखाद्या गोष्टीची आवड आणि दृढनिश्चय असेल तर वय हा केवळ आकडा ठरतो. हरियाणातील कादमा गावातील रहिवासी असलेल्या १०७ वर्षीय रामबाई यांनी सिद्ध केलं की स्वप्नांना कोणतीही एक्स्पायरी डेट नसते. राष्ट्रीय मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रामबाई यांनी मिळवलेली दोन सुवर्णपदके ही त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहेत. रामबाई यांच्या उदाहरणातून आपणही प्रेरणा घेऊयात आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही, हे स्वत:ला सांगुयात," असं पटेल यांनी लिहिलं होतं. पटेल यांच्या याच पोस्टला रिप्लाय देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. वय हा तर केवळ एक आकडा आहे."
दरम्यान, वय हा केवळ आकडा असेल तर तुम्ही शरद पवार यांना राजकीय निवृत्ती घेण्याचे सल्ले का देत होतात, अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांकडूनही प्रफुल्ल पटेल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एका महिला खेळाडूचं अभिनंदन करताना प्रफुल्ल पटेल यांनी वापरलेले शब्द त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरलेले दिसत आहेत.