शिक्षणाच्या भारतीयकरणासाठी केंद्राला संदेश योगेश पांडे - नागपूरदेशात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील ‘अच्छे दिन’ आले आहेत. समाजकारण, राजकारणासोबतच आता शिक्षणक्षेत्रातदेखील पाया मजबूत करण्याची भूमिका असलेल्या संघाकडून शिक्षणप्रणालीत बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. निरनिराळ्या अभ्यासक्रमांतील पाश्चिमात्य प्रभाव कमी करुन त्या जागी देशातील पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. एकूणच देशातील शैक्षणिक अभ्यासक्रमांत संघाचा ‘अजेंडा’ समाविष्ट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने नागपुरात मंगळवारपासून आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्वत् परिषदेदरम्यान असाच सूर उमटला. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील या परिषदेत आपल्या मार्गदर्शनादरम्यान शिक्षणक्षेत्रात बदलांची आवश्यकता असल्याचे मत करीत केंद्र शासनाला संघाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक सुधारणा करण्याचा अप्रत्यक्षपणे संदेशच दिला.आजच्या युगात शिक्षणातूनच नवीन पिढीवर व पर्यायाने देशावर संस्कार होतात. त्यामुळे शिक्षणप्रणालीत संघ विचारांचा चेहरा उमटणे आवश्यक आहे हे पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. देशात संघ परिवारातूनच समोर आलेल्या भाजपाची सत्ता असल्यामुळे या पाच वर्षांत शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करून पुढील पिढ्यांमध्ये आपला पाया मजबूत करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. आजच्या शिक्षणप्रणालीतील पाश्चिमात्य देशांचा प्रभाव दूर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन यातून जास्तीतजास्त कसे होईल यासंदर्भात संघ परिवारातील शिक्षणतज्ज्ञ अध्ययन करीत आहेत. शिक्षणप्रणालीतून लुप्त होत चाललेली भारतीय मूल्ये परत रुजविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा ‘रोडमॅप’च या परिषदेच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञांनी मांडला आहे. शिक्षणाचे ‘भारतीयकरण’ करण्याची योजना सर्वसमावेशक आणि व्यापक असावी अशी संघाची भूमिका आहे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना तयार करण्यावर संघ परिवार गुंतला आहे. पारंपरिक शिक्षणप्रणालीत काम करणाऱ्या संघटनेबाहेरील व्यक्तींजवळ जाऊन प्रयोग, अनुभव यांचे आदानप्रदान करण्याचीदेखील त्यांची तयारी आहे.आपल्या देशात शिक्षणक्षेत्रामध्ये काम करणारे लोक जुन्या प्रणालीला कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. परंतु हे परिवर्तन होत असताना नवीन समस्या उत्पन्न होणार नाही याचीदेखील काळजी घ्यायला हवी असे मत डॉ.भागवत यांनी व्यक्त केले. ‘केजी टू पीजी’ मध्ये बदलाची भूमिकाअगदी ‘केजी’ पासून ते उच्चशिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची संघाची भूमिका आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून संघातर्फे यासंदर्भात जोरदार तयारी सुरू आहे. विद्यापीठ, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे, व्यापक परंतु सर्वसमावेशक अभ्यासक्रम लागू करणे, संशोधन पद्धतीत बदल आणणे यावर संघाचा भर आहे. या संपूर्ण योजनेचा प्रारंभ शिक्षणशास्त्राच्या पुनर्रचनेपासून करण्याचा संघ परिवाराचा मानस आहे. शिक्षणाचे भारतीयकरण या प्रक्रियेचे ६० वर्षांत विभाजन करण्यात आले असून पाच निरनिराळे टप्पे ठरविण्यात आले आहेत.
शिक्षणात दिसणार संघाचा ‘अजेंडा’
By admin | Published: November 27, 2014 12:25 AM