नागपूर : देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया यांनी गुरुवारी नागपुरात यासंदर्भात सूतोवाच केले. ही मूल्ये निरनिराळ्या शिक्षणशाखांच्या अभ्यासक्रमात आणण्यात काहीच गैर नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वक्तव्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते़ मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने नागपुरात अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शिक्षणक्षेत्रात बदलांची आवश्यकता असून भारतीय पारंपरिक मूल्यांचा त्यात जास्तीत जास्त प्रमाणात अंतर्भाव करण्यात यावा असा सूर यात उमटला होता. यावेळी संघ परिवारातील निरनिराळ््या संघटनांसह सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील या मुद्याच्या समर्थनार्थ भाष्य केले होते.यासंदर्भात डॉ.कठेरिया यांना विचारणा करण्यात आली असता या विचारांमध्ये काहीच गैर नसल्याचे ते म्हणाले. भारतीय परंपरा आणि विचारपद्धती टिकविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. संघाने मांडलेली भूमिका अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शिक्षणप्रणालीत दिसणार संघाचा ‘अजेंडा’!
By admin | Published: January 16, 2015 5:40 AM