मयूर तांबडे,
पनवेल- पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्याने त्या बदलून घेण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांच्या लांबच लांब रांगा बँकांसमोर लागल्या आहेत. ज्यांचे कोट्यवधी रुपये जमा आहेत, त्या सर्वांचीच नोटा बदलून घेण्यासाठी त्रेधातिरपीट होत आहे. यातच आता बंद नोटा बदलून ३० ते ४० टक्के कमिशन घेऊन पैसे बदलून देणारे रॅकेट सक्रिय झाल्याची खात्रिशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.काळ्या पैशाविरोधातील लढाईत सर्वसामान्य नागरिक दररोज रांगेमध्ये उभे आहेत. मात्र, या रांगांमध्ये धनदांडगे का दिसत नाहीत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काहींनी शासनाचा थकविलेला कर चुकविला आहे, तर काहींनी सोने खरेदी केले आहे. आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये बँकांसमोर रांगा लावून नोटा बदलून घेण्यासाठी एजंट उभे करून ३० ते ४० टक्के कमिशन आकारले जात आहे. त्यामुळे बँकेसमोरील रांगेत उभी असलेली व्यक्ती नेमकी कोणासाठी, कोणता व्यवहार करते, याचीही शहानिशा पोलिसांना करावी लागण्याची शक्यता आहे.ज्यांच्या खात्यावर कधीच दोन-अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम कधी आली नाही, अशा लोकांच्या खात्यावर एजंट पैसे भरू शकतात. हे रॅकेट बँकेच्या व नागरिकांच्या सतर्कतेनेच उघड होऊ शकते. >एजंटद्वारे काळा पैसा बदलण्याच्या प्रकाराची माहिती अद्याप समोर आलेली नाही किंवा तशी तक्रारही आलेली नाही. मात्र, तसेच निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करून आयकर विभागाला कळविले जाईल.- विश्वास पांढरे, पोलीस उपायुक्त