मुंबई : घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून किंवा घराची विक्री करणाऱ्या ग्राहकाकडून एजंटने किती कमिशन घ्यावे, याची कोणतीही मर्यादा नाही किंवा यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. कमिशनचा मुद्दा आमच्या अखत्यारित येत नसल्याचे महारेराकडून सांगण्यात आले. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंटसच्या २२ नोव्हेंबरला झालेल्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४९५४ पैकी ४४६१ उमेदवार यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७६७८ उमेदवार एजंट होण्यास पात्र ठरले आहेत.
घराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना किंवा जमीन, घर भाड्याने देताना एजंटने किती कमिशन घ्यावे ? यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे कमिशन प्रकरणात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कोणाकडे न्याय मागावा ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. एजंट हा घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते.
महामुंबई परिसर अव्वल
एजंट परीक्षेत मुंबईच्या पल्लवी उपाध्याय, ठाण्याचे अनिलकुमार खंडेलवाल आणि रायगडचे सनी दुग्गल या तिघांनी ९८ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे. ६० वर्षांवरील २०० उमेदवारांत ८ महिला तर एकूण ४४६१ उमेदवारांत ६५८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ७० वर्षांवरील एकूण १० पैकी दोघे ८० वर्षांवरीलपैकी एक ८५ चे तर दुसरे ८२ वर्षांचे आहेत. नागपूरचे एक उमेदवार तब्बल ८५ वर्षांचे आणि दुसरे पुण्याचे उमेदवार ८३ वर्षांचे आहेत. हे या निकालाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
महारेराच्या सुरुवातीच्या काळात सुमारे ४५ हजार एजंटची नोंद झाली होती. आता यापैकी १३ हजार एजंटने परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडली नाही. सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती दिली जाते म्हणून महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.