नेर (यवतमाळ) : दैनिक वसुली करणाऱ्या एजंटानेच नेरच्या महिला अर्बन क्रेडीट को.आॅप. सोसायटीला पेट्रोल टाकून आग लावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. रवींद्र रामभाऊ भोयर (रा. नेर जि. यवतमाळ) असे या एजंटाचे नाव आहे. तो महिला अर्बन को.आॅप. क्रेडीट सोसायटी मर्यादित नेरचा दैनिक वसुली एजंट आहे. या पतसंस्थेतील गैरव्यवहार दडपण्यासाठी ही आग लावली गेल्याचा संशय आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे भासविण्याचा मनसुबा होता. मात्र एजंट रवींद्र भोयर आग लावण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री गेला, त्याने पतसंस्थेतील कागदपत्रे एकत्र करून त्यावर पेट्रोल ओतले. आग लावून तो तेथून पळण्याच्या तयारीत होता. मात्र पतसंस्थेचे त्यानेच बंद केलेले शटर पुन्हा उघडले नाही. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर त्यानेच बचावासाठी आरडाओरड केली. या पतसंस्थेच्या समोरच्या असलेल्या नेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून एजंट भोयरला बाहेर काढले. ३२ टक्के जळालेल्या अवस्थेत त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीच्या या घटनेत पतसंस्थेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण आणि शिपाई विलास पोहणकर हेसुद्धा सहभागी असल्याचे एजंट भोयरने बयानात सांगितले. पोलिसांनी तूर्त भोयर व शिपाई विलासविरुद्ध गुन्हा नोंदविला असून विलासला अटक केली आहे. नेमका कोणता गैरव्यवहार दडपण्यासाठी आगीचे हे षडयंत्र रचले गेले, त्यात कोण कोण सहभागी आहे, याचा शोध नेर पोलीस घेत आहे. स्वत: एजंटानेच आपल्या पतसंस्थेला आग लावण्याची ही पहिलीच घटना असावी. (प्रतिनिधी)
एजंटानेच पेटविली नेरची पतसंस्था
By admin | Published: November 07, 2014 12:47 AM