अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. खड्डे आणि चिखलामुळे प्रवासी आणि वाहन चालक मेटाकुटीस आलेले असताना तसेच यापूर्वीही अनेक निवेदने देवूनही रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नसल्याने सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून तेथील अभियंत्यांना सज्जड दमच दिला. खड्डे तत्काळ बुजवून रस्ते दुरुस्त केले नाहीत तर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्याच रस्त्यावरील चिखलात लोळवण्याचे आमचे पुढचे आंदोलन असल्याचा इशारा यावेळी मनसेने दिला.येथील प्रमुख महेश कुन्नुमल यांनी उपस्थित कार्यकारी अभियंता बी.एस. खोब्रागडे यांना चिखलाची पिशवी भेट म्हणून दिली. रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवा, रस्त्यावर चिखल होणार नाही याकरिता उपाय योजना करा, आणि रस्त्याच्या दुरवस्थेस कारणीभूत अभियंते व कंत्राटदारांवर कारवाई करा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी मनसे महिला आघाडी सचिव अश्विनी कंटक, उप जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, नितीन ढेपे, अनिल कंटक आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा, अन्यथा आंदोलन
By admin | Published: August 02, 2016 3:01 AM