मुंबई : आरक्षणाने नगरसेवकांचीच नव्हे तर राजकीय पक्षांचीही चांगलीच कोंडी केली आहे. आरक्षणात दिग्गज बाद झाल्यामुळे अनुभवी नेत्यांची वानवा निर्माण झाली आहे. आक्रमक, नेतृत्वगुण असलेले दिग्गज बाद झाल्याचा फटका शिवसेना व काँग्रेस या मोठ्या पक्षांना बसला. आरक्षणाने गोची केल्यानंतर प्रभाग फेररचनेने राजकीय पक्षांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. ८० टक्के प्रभागांचे तुकडे, मतदार विखुरलेले आणि तिकिटांसाठी पक्षांतर्गत हेवेदावे यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी सध्या कमालीची वाढली आहे. मात्र या सर्व कटकटीनंतरही निवडून येण्याची शाश्वती फारच कमी जणांची आहे. यामुळे निष्ठावंत, आक्रमक आणि जुन्या जाणत्यांनाच मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आरक्षणाने महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागले. काहींनी आपल्या पत्नी, बहीण व मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नगरसेवकपद घरातच राहील, याची व्यवस्था केली. मात्र आक्रमक व विरोधकांशी दोन हात करणारे अभ्यासू नगरसेवक बाद झाल्याचा फटका शिवसेना, काँग्रेस या पक्षांना प्रामुख्याने बसला. काँग्रेसला विरोधी पक्षनेत्यासाठी तर शिवसेनेला आक्रमक नेतृत्वासाठी चाचपडत राहण्याची वेळ आली आहे. यामुळे मित्रपक्ष भाजपाही या काळात डोईजड बनला. त्यामुळे माजी नगरसेवकांना पुन्हा सक्रिय करण्याची तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच माजी नगरसेवकही कामाला लागले आहेत. महापालिकेचे नियम, कायदा, प्रचाराचे मुद्दे आणि वक्तृत्व कौशल्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराला थोपवण्याची ताकद असलेले माजी नगरसेवक पक्षाची पहिली पसंती ठरत आहेत. गेल्या निवडणुकीत काही दिग्गजांना पक्षात महत्त्वाचे पद देऊन त्यांचे पुनर्वसन केले गेले. त्यामुळे मार्गदर्शक म्हणून महापालिकेचा कारभार गेली पाच वर्षे जवळून पाहणाऱ्या या निरीक्षकांचे मत तिकीट वाटपात महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)।शिवसेना आक्रमक नेतृत्वाच्या शोधात गेल्या वर्षभरात महापालिकेत अनेक घोटाळे उघड झाले. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनाही अडचणीत आली आहे. त्यात मित्रपक्ष भाजपानेही घात केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. अशा वेळी महापालिकेत पक्षाचा आक्रमक नेता नसल्याचा फटका शिवसेनेला बसत आहे. महापालिकेतील शिलेदार कमी पडत असल्याने माजी नगरसेवकांवर शिवसेनेची मदार आहे. विरोधक या घोटाळ्यांचे भांडवल करून नाकाबंदी करणार याची जाणीव असल्याने शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जाणकारांची गरज भासणार आहे. ही नावे चर्चेत शिवसेनेतून माहीममधून मिलिंद वैद्य, दादरमध्ये विशाखा राऊत, विक्रोळीतून दत्ता दळवी, माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर आणि सर्व आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या राजुल पटेल. काँग्रेसमधून नऊ वर्षे विरोधी पक्षनेते राहिलेले राजहंस सिंह... आमदारपदही त्यांनी भूषवले आहे. कुलाब्यातील पूरन दोषी, सायन-अॅण्टॉप हिलचे रविराजा, उपेंद्र दोषीभाजपामध्ये नेतृत्वाची कमी नाही, असे भाजपच्या वरिष्ठांचे मत आहे. मात्र युती न झाल्यास मिशन शंभर पार करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाचे तगडे दावेदार भाजपाने आपल्याकडे वळवले आहेत. यात काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर देसाई, कमलेश यादव व एकेकाळी भाजपाचे गटनेतेपद भूषवणारे भालचंद्र शिरसाट यांचा समावेश आहे. सात माजी महापौर रिंगणात? शिवसेनेच्या विशाखा राऊत, दत्ता दळवी, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव, डॉ. शुभा राऊळ, हरेश्वर पाटील, महादेव देवळे या माजी महापौरांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पक्षांना हवेय आक्रमक नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 2:31 AM