Raj Thackeray ( Marathi News ) : पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिले, असा चिमटा राज यांनी काढला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून प्रवक्ते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.
राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना अमोल मिटकरी म्हणाले की, "सुपारीबहाद्दरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर बोलू नये. कारण टोलनाका, भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारीबहाद्दरांचे यशस्वी झालेलं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे," असा घणाघात मिटकरी यांनी केला आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर आक्रमक शब्दांत हल्ला केल्याने यावर मनसेच्या गोटातून नक्की काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
पुण्यात आलेल्या पुरावरून सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, "एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिलं. मुळा-मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. लोकांची अनेक वाहने पाण्याखाली होती. लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल तर राज्य सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे मी पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असं सांगतोय, टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. शहर नियोजनात शाळा, बागा या गोष्टी येतात. पण राज्यात कुठेही हा प्रकार दिसत नाही. दिसली जमीन की विक हा प्रकार राज्यात सुरू आहे," असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
दरम्यान, महापालिका अधिकारी, बिल्डर, प्रशासन या साखळीतून या गोष्टी होतायेत. पुण्यात एक शहर राहिले नाही तर ५-५ शहरं झालीत. पुण्यात खूप कमी काळात या गोष्टी घडल्यात. शहर कुठपर्यंत पसरतंय हे कळत नाही. गेली २-३ वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही मग जबाबदारी घेणार कुणी, प्रशासनाशी बोलायचं कुणी यामुळे या पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाहेरून येणाऱ्यांना फुकट घरे मिळतात या राज्यातील लोकांना भीका मागावी लागते. राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही. प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कुणी विचार करणार की नाही. झोपडपट्टी पूर्नवर्सनात अनेक बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात घरे घेतायेत असं सांगत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.