मुंबई :एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संपाच्या माध्यमातून लढा सुरूच असून शनिवारी सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानात ठाण मांडले. दुसरीकडे राज्य सरकारबरोबर आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यातून अजून तोडगा निघालेला नाही.परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही. हायकाेर्टाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालावर सकारात्मक निर्णय घेऊ. विलीनीकरणाबाबत महाधिवक्त्यांशी चर्चा करू, असे आश्वासन परब यांनी दिले आहे. आतापर्यत २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कधीकाळी देणारे हात झाले आता मागणारे/स्टेट पोस्ट
कुणाच्या तरी भडकावण्यावरून आंदाेलन करू नका. आंदाेलनामुळे प्रवासी एसटीपासून दूर गेला तर ताे एसटीकडे पुन्हा आकर्षित हाेणार नाही. त्यामुळे भविष्यात माेठ्या संकटांना सामाेरे जावे लागेल. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर यावे. - अनिल परब, परिवहनमंत्री
चर्चेनंतरही संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे विलीनीकरणाबाबत महाधिवक्त्यांबरोबर चर्चा करण्याची सूचना केली.- ॲड. गुणरत्न सदावर्ते, कर्मचाऱ्यांचे वकील
लक्ष्य फक्त विलिनीकरणगावगाड्यातील एसटी कर्मचारी हा न्यायहक्काचा लढा लढत आहे. पण खाजगीकरणाची अफवा पसरवली जात आहे. ही मालमत्ता तुमची नाही, महाराष्ट्राच्या जनतेची आहे. आता अर्जुनाप्रमाणे लक्ष्य फक्त विलिनीकरण ठेवा. - सदाभाऊ खोत, माजी मंत्री, संस्थापक, रयत क्रांती संघटना
आम्ही तुम्हाला फक्त विलीनीकरण करा असे म्हणत नाही, तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळते तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसे मिळू शकते, हे सांगितले आहे.- गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
महामंडळात एकूण ९२ हजार २६६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सात हजार ३१५ कर्मचारी कामावर हजर झाले. शनिवारी सायं. ६ पर्यंत राज्यात १४३ एसटी धावल्या.