गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, यासाठी गडचिरोलीसह तालुकास्तरावर सोमवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीत ५२ आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. उलट विदर्भाच्या निधीचा अनुशेष वाढतच चालला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन होत असताना सदर वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. विदर्भवासीयांना मात्र भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण येत आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असल्याने येथील विजेचे दर कमी करावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहेत.या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सोमवारी विदर्भात तालुका, जिल्हा व प्रमुख ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळाला. गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक या मुख्य चौकात जवळपास १५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चारही मार्गांवर वाहनांची मोठी रांग लागली होती. जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यादरम्यान आंदोलनकर्त्या ५२ जणांना स्थानबद्ध करण्यात आले.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 2:00 PM