ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि.16- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अजूनही कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे बॅनर तसेच झेंडे लावलेले दिसून येत आहेत. ते तत्काळ हटविण्यात यावेत.अन्यथा त्याविरोधी आम्हाला आंदोलन करावे लागेल.असा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गणेश महाडिक यांना सोमवारी देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आणि पचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कुठल्याच राजकीय पक्षाकडून होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. राजकीय पोस्टर आणि बॅनरद्वारे राजकीय पक्षांचा प्रचार होऊ शकतो. या कारणास्तव शहरातील आणि शहर हद्दीलगतच्या कलमठ, जानवली, तरंदळे, नागवे, हरकुळ (बु), वागदे आदी गावांतील राजकीय बॅनर काढण्यात आले आहेत.
कणकवली पोलीस स्थानकालगतच्या प्रवासी निवारा शेडवरीलही बॅनरही प्रशासनाने काढायला सांगितल्याने युवक काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी ते काढले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी त्यानी स्वखर्चाने बांधलेल्या पिकपशेड वरील सावली यामुळे उध्वस्त झाली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला उन्हात उभे राहावे लागत आहे. मात्र, याउलट कणकवली शहरातील पटवर्धन चौकात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रासह असलेल्या स्पर्धेच्या बॅनरमुळे पक्षीय प्रचार होत आहे. सत्ताधाऱ्यांना बॅनरसाठी मुभा देऊन प्रशासन विरोधी पक्षाला सापत्नपणाची वागणूक देत आहे. असा आरोप करीत संदीप मेस्त्री यांनी युवक काँग्रेसच्या वतीने याबाबत कणकवली तहसीलदारांना निवेदन देवून त्यांचे लक्ष याकडे वेधले आहे. हे बॅनर प्रशासनाने न काढल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचेही बॅनर याठिकाणी लावले जातील असा इशाराही त्यानी दिला आहे.
तहसिलदाराना निवेदन देताना युवक काँग्रेसचे गणेश तळगावकर, सुनील साळसकर, नितीन पाडावे, सचिन पारधिये आदी पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)