सातारा- दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान एकीकडे दुधाचे टँकर रस्त्यावर रिकामे जात असताना, दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या जात असताना, दुसरीकडे मात्र काही दूध उत्पादकांनी अनोख्या पद्धतीनं आपला निषेध व्यक्त केला. वाळवा येथे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणारं दूध स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडे जमा केलं. या दुधाचं वाटप कार्यकर्त्यांकडून गोरगरीबांमध्ये करण्यात आलं. याशिवाय झोपडपट्ट्यांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दुधाचं वाटप करण्यात आलं. खटावमधील उंबर्डेतील दूध उत्पादकांनी दूध संकलन करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना गरम दुधाचं वाटप केलं. तर शिरगावमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शाळेत आणि गावात 200 लिटर मसाला दूध वाटलं. इचलकरंजीतील झोपडपट्टी परिसरातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुधाचं वाटप करण्यात आलं. कवठेमहांकाळमधील कुची येथे हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर उरलेल्या दुधाचं मोफत वाटप करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभरात एल्गार पुकारला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला, तरी दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
कुठे वारकऱ्यांना मोफत दूध; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 9:03 PM