भिवंडी : जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.शुक्रवारी रात्री भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, माजी उपमहापौर इम्रान खान, अहमद सिद्दीकी आदी उपस्थित होते.देशातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती देणारी अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खासकरून उत्तर भारतात अनेक युवक रस्त्यावर उतरून या योजनेचा निषेध करीत आहेत. त्यांचा उद्रेक हळूहळू देशभरात पसरत आहे. त्याबद्दल आव्हाड यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारच्या सैन्यभरती योजनेवर टीका केली.
चार वर्षानंतर वाऱ्यावर सोडणार का?सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक दोन-तीन वर्षे खडतर मेहनत करतात. अशा युवकांनी चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणार का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. एसटी कामगारांच्या कंत्राटी भरतीस विरोध करणारे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करीत घुसले, तेच आता या सैन्य दलातील कंत्राटी पद्धतीचे समर्थन करतात, हे हास्यास्पद आहे, असा टोलाही आव्हाड लगावला.