पुणे : शुक्रवार पेठेतील साठ वर्षे जुन्या वाड्याला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण वाडा बेचिराख झाला. या आगीच्या झळांमुळे शेजारच्या वाड्याची भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर अग्निशामक दलाचे चार जवानही जखमी झाले. अग्निशामक दलाच्या १४ गाड्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. प्रवीण बन्सल (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. तर महेश गारगोटे, नीलेश कर्णे, सचिन जोंजाळे आणि जितेंद्र सपाटे असे दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.हरिहर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा हा साठ वर्षांचा जुना वाडा आहे. वाड्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात लाकूड आणि मातीचा वापर करण्यात आलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून या वाड्यात कोणीच राहत नव्हते. परंतु, या वाड्यात राजू बन्सल नामक इसमाचा स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणावर फिनेल, खराटे, झाडू आदी वस्तू होत्या. या वाड्यातून धूर येऊ लागला. त्यानंतर काही वेळातच या वाड्याच्या छपरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडू लागले. हे पाहून परिसरातील नागरिकांनी २.३० वाजता याची माहिती अग्निशामक दलास दिली.ही आग कशाने लागली याची ठोस माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही; मात्र फटाक्यांचा साठा असल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात1 अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. वाड्याच्या बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर असल्याने आणि खाली फिनेल, खराटा, झाडू यांसारख्या वस्तू असल्याने आग क्षणाक्षणाला वाढतच होती. 2 आगीचा धूर आणि आगीच्या ज्वालामुळे परिसरातील रहिवाशांनी कुटुंबीयांसमवेत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. 3अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचे काम सुरू केले आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.आग लागल्याचे समजताच दुकानमालक प्रवीण बन्सल यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानात प्रवेश केला. आगीची झळ शेजारील वाड्याला लागली होती. मातीची भिंत क्षणार्धात कोसळली. यामध्ये ते गाडले गेले त्यांना रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामध्ये दलाचे चार जवानही जखमी झाले.
शुक्रवार पेठेत अग्नितांडव
By admin | Published: May 04, 2017 3:13 AM