मुंबई : राज्याच्या शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कृषी उत्पादनांची विक्री करता येणार आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांचे उच्चाटन करणे आणि कृषिमालाला रास्त दर मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारात ‘शेतमाल कॉप शॉप’ चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभ्यासक रमेश प्रभू यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘सहकारांतर्गत सहकार’ या मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतमाल उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, बचत गट इत्यादींमार्फत शहरांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाºया नागरिकांना रास्त दरात स्वच्छ, ताजा आणि दर्जेदार कृषिमाल पुरविण्याचा उद्देश यामागे आहे.
संस्थेच्या आवारात उपरोल्लेखित पुरवठादारांना त्यांच्या कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादनांची विक्री मोबाइल शॉपद्वारे (वाहन) करता येईल. मोबाइल शॉप उभारण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि पुरवठादार संस्थेमध्ये जागा पुरवण्याबाबत १ ते ३ वर्षांपर्यंत करार करता येईल. अधिक माहितीसाठी संस्थांनी विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक/ साहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्थेशी संपर्क साधावा.सामंजस्याने ठरतील दरगृहनिर्माण संस्थेने संस्थेच्या आवारात स्वत:मार्फत हे दुकान चालवायचे आहे. यासाठी संस्थेच्या आवारात किमान १०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. दुकानाच्या उभारणीचा खर्च संस्थेने स्वत: करावयाचा आहे.गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि पुरवठादार परस्पर सामंजस्याने उत्पादनांचे दर ठरवतील. संस्था एक किंवा गरजेनुसार एकापेक्षा अधिक सहकारी संस्था, शेतकरी गट/कंपनी, बचत गट यांच्यासोबत करार करू शकते.