अकोला: शासनाच्या कृषी खात्यामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात कृषी जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. गावागावात राबविण्यात येणार्या या कार्यक्रमात शेतकर्यांसह ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यावर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात कृषी सप्ताह साजरा करण्यास शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या निर्णयान्वये १८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. या सप्ताहात राज्यातील गावागावात कृषीविषयक केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कृषी योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधित केलेले अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा कार्यक्रमात प्रत्येक गावात राबविण्याकरिता तालुका व जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. कृषी जागृती सप्ताहात गावपातळीवर गावागावातील शेतकरी, शेतकरी मित्र, शेतकरी बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या कृषी सप्ताहात कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावागावात शेतकर्यांच्या बैठका घेऊन कृषी विभागाच्या योजना आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना देणार आहेत.
*अंमलबजावणीत या विभागांचा राहणार सक्रिय सहभाग!
कृषी जागृती सप्ताहाच्या अंमलबजावणीत कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी पणन मंडळ, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका आणि कृषी संलग्न सर्व विभागांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे.