पुणे, दि. 24- सध्या शेती क्षेत्राची अवस्था इतकी बिकट आहे की, शेतकरी शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. या परिस्थिती कोणी हातची चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेणार नाही. पण पुण्यात राहणा-या एका तरुणाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडूनशेती क्षेत्रात करीयर करण्याचा निर्णय घेतला. हेमल पटेल असे या युवकाचे नाव आहे. पेशाने कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या हेमलने तीनवर्षांपूर्वी 2013 साली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रात प्रवेश केला.
आज तीनवर्षांनी हेमल या क्षेत्रात ब-यापैकी स्थिरस्थावर झाला आहे. सेंद्रीय शेतीचे तंत्र शिकून घेतल्यानंतर हेमल आता कार्यशाळांच्या माध्यमातून शहरी भागात शेती शक्य आहे हा विचार लोकांच्या मनावर बिंबवत आहे. हेमलला रानात, गावात भटकंतीची आवड होती. शनिवार-रविवारी गावात फिरताना शेती करण्याच्या तंत्राने हेमलचे लक्ष वेधून घेतले. शेतीसंबंधी अधिक माहिती जाणून घेताना त्याला शेतीबद्दल आवड निर्माण झाली.
नोकरी सोडल्यानंतर हेमल वेगवेगळया फार्म्सवर गेला आणि तिथे सेंद्रीय शेती करण्याच्या नव्या पद्धती शिकून घेतल्या. शहरातील लोक स्वत:चे अन्न स्वत: का पिकवत नाही ? असा मला प्रश्न पडायचा. मी नोकरी सोडताना अनेक लोकांना भेटलो त्यांना सेंद्रीय शेतीमध्ये भरपूर रस होता. पण शेतीचे तंत्र त्यांना माहिती नव्हते. माहितीची ही कमतरता दूर करण्यासाठी हेमलने अर्बन सॉईल हा उपक्रम चालू केला असून, शहरातंर्गत मर्यादीत जागेत शेती क्षेत्र विकसित करणे हा उपक्रमामागचा उद्देश आहे.
हेमल आता दोन दिवसांच्या कार्यशाळा आयोजित करुन नागरीकांना सेंद्रीय शेतीचे तंत्र शिकवतो. तीनवर्षात मी जे ज्ञान कमावलेय ते इतरांना देतो असे हेमलने सांगितले. आपले अन्न आपणच पिकवणे का आवश्यक आहे ? हे मी प्रशिक्षणार्थींना पटवून देतो. शहरात शेती करण्यामध्ये जागेची कमतरता ही मुख्य समस्या आहे. मी जिथे राहतो तिथे जागा नसल्यामुळे शेती करता येत नाही. पण माझ्या परिचयाचे काही लोक आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत मी त्यांना गार्डन बनवून दिले आहे. जिथे आज वेगवेगळी पिके घेतली जातात असे हेमलने सांगितले.