पेण : मान्सूनच्या हालचाली सुुरु झाल्याने पेणच्या खरीप हंगामासाठी पेणच्या कृषी विभागाची पूर्ण तयारीनिशी सज्जता झाल्याचे पेण तालुका कृषी अधिकारी वसंत मोरे व पेण पं. स. कृषी अधिकारी एन. एन. भालेराव यांनी सांगितले. यावर्षीच्या खरीप हंगामाची तयारी म्हणून ४००० क्विंटन बियाणे तर ५००० मेट्रीक टन खतांची मागणी असून शेतकर्यांच्या मागणीनुसार थेट बांधावर खते मागणीनुसार पोहचविली जातील असे कृषी विभागाने हंगामाच्या तयारीचे योग्य नियोजन केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या वर्षीचा मान्सून वेळेतच दाखल होत असून या खरीपात शेतकरी बांधवांना भात बियाणांचा साठा वेळेतच आलेला आहे. पेणच्या खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये २००० क्विंटल बियाणांची आवक झाली आहे. पांडापूर गोडावून ३०० क्विंटल तर पेण शहरातील व ग्रामीण परिसरातील भात बियाणे विक्रेत्यांकडेही भातबियाणांची आवक झालेली आहे. यावर्षी हवामानशास्त्र खात्याच्या हवामान अंदाजानुसार ९५ टक्के मान्सूनचे भविष्य वर्तविले आहे. मान्सूनचा प्रवास अंदमान निकोबारच्या बंगाल उपसागरातून केरळ राज्याच्या दिशेने मान्सून वाटचाल करत असल्याने शेतकर्यांना पावसा अगोदरच्या धूळपेरण्या करण्याची लगबग सुरु झाली आहे. २५ मे रोजी सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश होत असल्याने एकदा का रोहिणी नक्षत्र सुरु होताक्षणी शेतकरी धूळपेरण्या करण्यास प्रारंभ करतो. २५ मे ते ५ जून या दहा दिवसात या पेरण्यांचा शेड्यूल राहणार असल्याने येत्या पंधरा ते वीस दिवस भातबियाणे खरेदी - विक्री केंद्रावर शेतकरीबांधव बियाणांची खरेदी करण्यावर भर देणार आहे. शेतकर्यांची खरीप हंगामाची बेगमी म्हणून कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले असून ४००० क्विंटल भात बियाणामध्ये संकरित अशा भाताच्या वाणांचे बीज विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. शेतकर्यांना पावसाअगोदर खतांची उपलब्धता व्हावी म्हणून ५००० मेट्रीक टन खतांची मागणीही केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे शेतांच्या बांधावर थेट खत पोहचविले जाणार आहे. यासाठी शेतकर्यांनी फिल्डवरच्या कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागणी केल्यास गावच्या शेतकर्यांच्या ग्रुपनुसार जेवढी मागणी असेल तेवढी खते अगदी घरपोहच अथवा शेतांच्या बांधावर खत पोहचविण्याची व्यवस्था कृषी विभागाने केलेली आहे. गुणवत्ता नियंत्रक व निरीक्षक अथवा भरारी पथकांची व्यवस्था व नेमणूक करण्यात आलेली असून याद्वारे बियाणे विक्री केंद्रावर भरारी पथकाची करडी नजर असणार आहे. (वार्ताहर)
खरिपासाठी पेणचा कृषी विभाग सज्ज
By admin | Published: May 20, 2014 1:02 AM