Maharashtra Politics: परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दिलासा द्यावा, या मागणीसाठी विरोधक आग्रही तसेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी कुठे गेले कृषिमंत्री असा प्रश्न विचारला होता. याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोचरी टीका करत पलटवार केला आहे.
जमिनीवर गाऱ्यात फिरणे वेगळे अन् चॉकलेट खाणे वेगळे
ज्याला बाण समजते त्याला बांध समजले. त्यांनी स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही. बांध कसा ठेवू शकतात, असा प्रतिप्रश्न करत, मला वाटते, घरात चॉकलेट खाणे वेगळे, काम्प्युटरवर बसणे वेगळे आणि जमिनीवर या गाऱ्यात फिरणे वेगळे आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरे हे औरंगाबादला आले. त्यांचे अडीच तासांचे नियोजन होते. त्यात २४ मिनिटे पाहणी केली. काय २४ मिनिटांत महाराष्ट्राची पाहणी करू शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे बाण कोणते आहे. काम कोणते आहे आणि बांध कुठे आहे, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.
दरम्यान, समृद्धीच काम व्यवस्थित नाही झालेले, मजा मस्ती मध्ये सगळे चालले आहे, शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, शेतकरी बांधव संकटात कायम उभा असतो आपल्याला त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल. खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार पण समस्या सुटणार आहे का, अशी विचारणा करत, बांधावर आल्यावर कळत शेतकऱ्यांचे दुःख काय आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकावर घणाघाती टीका केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"