"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST2025-02-24T14:01:41+5:302025-02-24T14:23:42+5:30
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आमच्या हातात काहीच राहिलेले नाही असे म्हटलं आहे.

"मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही"; माणिकराव कोकाटेंचे विधान
Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना माणिकराव कोकाटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कोकाटे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं. आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असं विधाना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल असंही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
आम्हाला आता नीट काम करावंच लागेल - माणिकराव कोकाटे
"बहुमताने आम्ही या ठिकाणी निवडून आलो. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला की आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झालं पाहिजे. त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या पण हातात काही राहिले नाही. त्यामुळे तर आम्हाला आता नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल," असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे - प्रवीण दरेकर
माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "हे सर्व विधान सकारात्मकपणे घ्यायला पाहिजे. चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा मतीतार्थ मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत निगेटिव्ह नव्हता. सकारात्मकतेच्या बाजूने आपल्याला जावं लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले तर काय हरकत आहे. लोकांना कामाशी मतलब आहे. जर चांगली यंत्रणा तिथे असेल तेच महाराष्ट्रातील जनतेला तेच हवे आहे. ही जनता खुश होऊन सगळ्यांनाच आशीर्वाद देईल," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.