ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11- आतापर्यंत बोगस बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बियाणे उत्पादक कंपनीच्या आॅर्गनायझरने थेट कृषी अधिकाऱ्यांनाच धमक्या देणे सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. भंडारा येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुप्रिया कावळे असे त्या महिला कृषी अधिकाऱ्यांचे नाव आहे. यासंबंधी कावळे यांनी सोमवारी नागपुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार हिंगणघाट येथील मे. यशोदा हायब्रीड सीडस् कंपनीचे आॅर्गनायझर आनंद तळेकर रा. मांगली, ता. पवनी असे त्या धमकी देणाऱ्या आॅर्गनायझरचे नाव आहे. कावळे यांच्या मते, त्या मागील २४ जून २०१६ रोजी बियाणे तक्रारीच्या चौकशीसाठी आनंद तळेकर यांच्याकडे गेल्या होत्या. दरम्यान, तळेकर यांनी आपण हिंगणघाट येथील यशोदा सीडस् कंपनीचा आॅर्गनायझर असून, कंपनीसाठी सीडस् प्रोग्राम राबवीत असल्याचे सांगितले. त्यावर कावळे यांनी सीडस् प्रॉडक्शन प्रोग्रामबद्दल सविस्तर माहिती लिहून घेतली. यानंतर ९ जुलै २०१६ रोजी कावळे यांना एका मोबाईलवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण आनंद तळेकर बोलत असल्याचे सांगितले. शिवाय तुम्ही जर माझे जीवन खराब केले, तर मी सुद्धा तुमचे जीवन खराब करून टाकीन. मी तुमच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे. तुम्ही कसे काम करता, ते मी पाहतो. मी तुम्हाला जगू देणार नाही. तुम्ही कुणाच्या पत्नी आहात, ही सुद्धा मी माहिती काढली आहे. मला तुम्ही लिहून नेलेल्या माहितीची ओसी द्या, अशा शब्दात तळेकर यांनी थेट कावळे यांना धमकी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेऊन, लगेच पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (नि. व गु. नि.) यांना माहिती कळवून मे. यशोदा सीडस् कंपनीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी या धमकीने संपूर्ण कृषी विभागात खळबळ माजली आहे.
बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीकडून कृषी अधिकाऱ्याला धमकी
By admin | Published: July 11, 2016 9:06 PM