मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहे. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आव्हानांची भाषा वापरत आहे. कुठे भाजपा राष्ट्रवादीला विरोध करतंय तर कुठे शिवसेना भाजपावर आरोप करतंय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही स्थानिक पातळीवर बिनसल्याचं दिसून येते. मागील ३ दिवसांतील ३ घटनांमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुती तुटण्याचे हे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
पहिली घटना
अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर तालुक्यात गेली असताना त्याठिकाणी भाजपा नेत्या आशा बुचके यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तिथे अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर महायुतीत वाद निर्माण करणाऱ्या घटकांना समज द्यावी असं विधान सुनील तटकरेंनी केले. तर या प्रकरणी आमदार अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागितला. त्यावर भाजपा आमदार जगदीश मुळीक यांनी मिटकरींची लायकी काढत त्यांच्यावर निशाणा साधला.
दुसरी घटना
मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदमांनी भाजपा नेते मंत्री रवींद्र चव्हाणांवर आगपाखड केली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली. त्यावर रवींद्र चव्हाणांनीही पलटवार करत रामदास कदम अडाणी माणूस, तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान दिले. त्यावर माझे तोंड फोडायला तुला १०० जन्म घ्यावे लागतील. राक्षसी महत्वकांक्षा असणाऱ्यांना बाजूला काढा अन्यथा आम्ही वेगळे लढू असं रामदास कदमांनी म्हटलं. त्यावर भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी रामदास कदमांनी बालिश विधाने करू नये. आमचीही स्वतंत्र्य लढण्याची तयारी आहे असं प्रत्युत्तर दिले. रामदास कदमांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केली.
असले आरोप करणं कोणत्या युतीधर्मात बसतं? रामदास कदम यांचे काही म्हणणं असेल तर ते त्यांनी अंतर्गत मांडले पाहिजे. अशा प्रत्येक वेळी भाजप आणि नेत्यांना वेठीस धरणं यातून चांगली भावना तयार होत नाही. रामदास कदम यांचे काय म्हणणं आहे हे समजून घेऊन आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन. रामदास कदम असं वारंवार टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मने देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही देखील माणसं आहोत आणि ५० गोष्टी आम्हाला देखील त्यांच्या उत्तरासाठी बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. वारंवार भाजपला असं बोलणं आम्हाला मान्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सुनावलं.
तिसरी घटना
रायगड येथील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत ते विश्वासघातकी असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विश्वासघात करणारी पार्टी आहे, हे मी आज जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं, हेच त्यांचं काम आहे, हे आज आपण कर्जतमध्ये पाहत आहात. या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्वच विश्वासघातकी आहे असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं.
त्यावर महेंद्र थोरवे हे माझ्यासाठी अदखलपात्र आहेत, त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील असा खोचक टोला सुनील तटकरेंनी लगावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे रायगडचे सुधाकर घारे यांनी शिवसेना आमदार थोरवेंवर निशाणा साधला. २०१४ मध्ये शिवसेनेनं तिकीट न दिल्यानं त्यांनी शेकापकडून निवडणूक लढवली. त्यानंतर हरल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले. २०१९ ला त्यांना शिवसेनेनं तिकिट दिले तिथून ते निवडून आले त्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे विश्वासघात कोण करतंय हे जनतेला माहिती आहे असा पलटवार राष्ट्रवादीने शिवसेना आमदारावर केला. त्यामुळे मागील २ दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.