प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १३ - एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान,धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद असलेल्या अहिल्याबाई होळकरांचा आज (१३ ऑगस्ट) स्मृतीदिन.
३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”
आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली,राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद,महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर),त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.
१३ ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
सौजन्य : मराठी विश्वकोश