अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीचा आलेख वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्हा ९४ टक्के कुपोषणमुक्त झाला असून, लोकसहभागातून जिल्ह्यात ८३ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची २ हजार ८४९ बालके असून, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे.जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी १५ कलमी किलबिल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण दोन महिन्यांपासून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यात होम बेस सीडीसी, डिजिटल अंगणवाडी, गोपाल पंगत, मोबाइल अंगणवाडी, कुपोषण निर्मूलनाची गुढी, आईसी आणि प्री- अंगणवाडी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींमध्ये आढळलेले रक्ताक्षयाचे प्रमाण ५२ टक्क्यांहून २६ टक्केपर्यंत खाली आणण्यात महिला बालकल्याण विभागाने यश मिळविलेले आहे. नवविवाहितांचे समुपदेशन, मोहर प्रकल्प, सक्षम माता सभा यांच्या माध्यमातून जन्मता कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण २० टक्क्यांहून १० टक्क्यापर्यंत खाली आणण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वर्षांच्या ३ लाख ६१ हजार बालकांचे वजन घेण्यात आलेले आहे. जिल्ह्यात साधारण श्रेणीत ३ लाख ४१ हजार ४६५ बालके आहेत. मध्यम वजनाची १७ हजार १२९ बालके आहेत. तीव्र कमी वजनाची २ हजार ८४९ बालके आहेत. (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा बालकुपोषणमुक्तीच्या वाटेवर
By admin | Published: September 22, 2014 2:01 AM