मुंबई - अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचसोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नावही राजगड करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले होते.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.